लॉकडाऊन काळातील गृहिणींचे गृहव्यवस्थापन

लॉकडाऊन काळातील गृहिणींचे गृहव्यवस्थापन

 

मानवी जीवन हे अनेक चढउतार सुखदुःख,अडी-अडचणीतून व्यतीत होत असते.आज ज्या बेजबाबदार पद्धतीने पर्यावरणाचा ह्रास मानवाकडून केला जात आहे,अनैसर्गिक गोष्टी करण्याचा त्याचा वाढता हव्यास,आणि वाढती तामसी वृत्ती,यामुळे सहाजिकच मानवी आयुष्य जास्त संकटांच्या गर्तेत ओढले जातेय. याचे ताजे उदाहरण म्हणजे सध्या जगभरात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा वाढता असणारा प्रादुर्भाव.

    आपल्या देशात कोरोना सारख्या घातक रोगाची लागण सुरू होऊन चार महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला. त्यातील लॉकडाऊन म्हणजे सर्व व्यवहार, दळणवळण, कामधंदे बंद ठेवणे. घरातच विशिष्ट अंतर राखून राहणे ही सोपी व्याख्या.तर असे लॉकडाऊन सुरु होऊन सत्तर दिवस झालेत.भारतात प्रसार होण्यापूर्वी जगभरातील अनेक देशात या रोगाचा प्रादुर्भाव आणि त्याचे दुष्परिणाम मानवी जीवनावर दिसत होते,आहेत.इतर देशातही तेथील स्थितीनुसार लॉकडाऊन करण्याचा मार्ग अवलंबिण्यात आला. परंतु संसर्ग झपाट्याने वाढत राहिला. हा वेग लक्षात घेता भारतातही कोरोना ला प्रतिबंध करण्याचे प्रयत्न अर्थातच सुरू झाले.

         पण,यात ग्यानबाची मेख अशी होती की, कोरोना ला प्रतिबंध करण्यासाठीचे  औषध,लस उपलब्ध नाही. आणखी महत्त्वाचे म्हणजे या रोगावरचे नेमके उपचार देखील उपलब्ध नाहीत.ज्या विषाणूमुळे या रोगाची लागण होते त्याच्या प्रसाराची साखळी तोडणे आणि योग्य नियोजन करणे गरजेचे झाले. ही साखळी तोडण्यासाठी माणसांचा एकमेकांशी होत असलेला संपर्क रोखणे किंवा तोडणे हे पहिले काम करावे लागले. त्यालाच लॉकडाऊनचा काळ असे आपण संबोधतो. आपत्ती म्हणजे कोणत्याही प्रकारे आलेले संकट.या संकटाला सामोरे जाण्यासाठी जी काही काळजी, प्रतिबंधात्मक उपाय, उपचार, यांचे नियोजन करावे लागते त्यालाच आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात.मग ते विश्वस्तरावरअसो.देश,गाव,कौटुंबिक पातळीवर असो.किंवा, अगदी वैयक्तिक जीवनातही या आपत्ती व्यवस्थापनाचा समावेश करावाच लागतो.अन्यथा अचानक उद्भवणाऱ्या संकटांनी सर्व यंत्रणा किंवा कुटुंब किंवा व्यक्ती हतबल होऊन उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. आपत्तीचे अनेक प्रकार आहेत जसे की,निसर्गनिर्मित,आर्थिक, मानवनिर्मित,.कोरोना महामारी ही वैश्विक आपत्ती आहे.या आपत्तीचे व्यवस्थापन हे देश, राज्य, जिल्हा, गाव पातळीवर कसे राबवले गेले? त्याचे चांगले-वाईट,दूरगामी परिणाम; कोणत्या घटकांवर कसे झाले? याचा विचार या लेखात केलेला नाही.तर कोरोना आपत्ती काळात आणि लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर,घराघरातील गृहलक्ष्मींच्या अंगी जात्याच असणाऱ्या गृह व्यवस्थापनावर कटाक्ष टाकणार आहोत.कारण संसर्गाची  साखळी तोडण्याचे आव्हान पेलण्याची प्रत्यक्ष जबाबदारी व्यक्तिगणिक असली तरी अप्रत्यक्ष जबाबदारी गृहिणीं वरच होती.कुटुंबाला घरातच गुंतवून ठेवण्याचे,एका सूत्रात बांधण्याचे कसब तिला वापरावे लागत आहे.

           आता स्त्रिया घराबरोबरच घराबाहेर पडून विविध क्षेत्रात काम करतात.आणि अर्थार्जनही करतात.आधुनिक भाषेत सांगायचे तर आजची गृहिणी हि सुपरवुमन 'सुपरमदर अशी आहे. पारंपारिक भाषेत सांगायचे तर अष्टावधानी,दशभुजा आहे.एका वेळी अनेक काम आणि सर्व गोष्टींवर तिचे लक्ष असते. देश समाज कितीही पुरोगामी विचारांचे झाले असले तरी प्रत्यक्षात घरातील पुरुषांनी अगदी मुलगा असला तरी घरकाम करण्याची मानसिकता नसते. अर्थार्जन वगळता त्यांची गृह व्यवस्थापन करण्याची ही मानसिकता नसते.असलीच तर अगदीच बोटावर मोजण्याइतपत कुटुंबात दिसते. त्यामुळे घर सांभाळून बाहेर स्पर्धेच्या जगात टिकून राहून काम करणे, अर्थार्जन करणे हे सुपरवुमन होण्यासारखेच आहे. बरं, घरकाम म्हणजे केवळ धुणी-भांडी,केर - फरशी, स्वयंपाक, एवढेच नसते. तर घरातल्यांची काळजी घेणे ज्येष्ठांची सेवा,बाजारहाट, सणवार, पाहुणे-रावळे,आले-गेले साफसफाई,खरेदी, मुलांच्या शाळा-कॉलेजची तयारी,नाश्ता, डबे,अभ्यास,परीक्षा,परीक्षेच्या काळातील नियोजन,त्यांचे मित्रमंडळी,नवऱ्याची देखभाल, किराणा सामान,दूध-दुभत्याची  व्यवस्था .असंख्य कामं.आणि ते ही आळस,आदळ-आपट करता; संयमाने करून बाहेर काम करणे. तेथेही संयमाने वागणे सोपे नसते.पण आताची स्त्री हे आव्हान लीलया पार पाडते.यात अर्थातच ग्रामीण भागातील स्त्रियांचा देखील समावेश आहे.ती देखील घरची जबाबदारी सांभाळून नवऱ्याला शेतीकामात मदत करते.अर्थार्जन ही करते.

        पण,हे कमी म्हणून की काय, तिच्या आव्हानात, कर्तव्यात,जबाबदारीत, लॉक डाऊनच्या काळात भरच पडली. कोरोना पासून स्वतःसकट कुटुंबाला; मानसिक,शारीरिक दृष्ट्या सुरक्षित ठेवण्याचे आव्हान तिच्यासाठी मोठे आहे.घरातील पुरुष सर्व सदस्य 24 तास, घरातच अनिश्चित काळासाठी वावरणार;अशी स्थिती अनेक दशकात गृहिणी पहिल्यांदाच अनुभवत आहे.कोरोना,लॉक डाऊन हे अनपेक्षित होते.लॉक डाऊन काळाची पूर्वतयारी करण्यासाठी वेळ ही मिळाला नाही.सर्व कुटुंब सर्व वेळ एकत्रच राहणार ही सुखाची एक बाजू जरी होती तरी दुसरी बाजू गृहिणीच्या गृहव्यवस्थापनाचा कस पाहणारी आहे.कष्टात वाढ करणारीच आहे.काही कुटुंबातील सदस्य लॉक डाऊन मुळे घरापासून लांब, परक्या ठिकाणी अडकलेली होती किंवा आहेत. त्यामुळे त्याची ही चिंता त्या व्यक्तीला घरी सुरक्षित आणणे यासाठीचे प्रयत्न देखील करावे लागत होते.प्रसव वेदना सहन करून नवीन जीवाला जन्म देणे स्वतःचा पुनर्जन्म अनुभवणे या दिव्यातून ती पार पडते,म्हणूनच अश्या संकटकाळात कुटुंबाचे स्वतःचे मनोधैर्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी ती धीराने पार पाडत आहे.भारतासारख्या अवाढव्य लोकसंख्या असलेल्या देशात कोविड १९ चा प्रसार आणि मृत्युदर त्यामानाने कमीच राहिला.हे यश जितकं शासन,प्रशासन आणि डॉक्टर,नर्स,पोलिस यांचं आहे तितकंच गृहिणीच्या आपत्ती व्यवस्थापनाचे आहे.

               रिकाम डोकं सैतानाचं घर'असं म्हणतात ते काही खोटं नाही.हातात काम नसल्याने हिंसकवृत्ती वाढली.त्यामुळे जगभर कौटुंबिक हिंसाचार वाढल्याची उदाहरणे प्रकाशात आली.भारतात मात्र ती कमीच राहिली.आणि महाराष्ट्रात नगण्यच.याचे ही श्रेय येथील सहनशील गृहिणीला जाते.इथे एकत्र कुटुंब पद्धती असल्याने प्रत्येकाचे वय वेगळे, सवयी, आवडी-निवडी भिन्न.त्या, बदलण्याची ताठरवृत्ती,या मधे समन्वय राखण्याची भूमिका गृहिणीला करावी लागत आहे. लॉकडाऊन काळात तर ही भूमिका अति आव्हानात्मक झाली आहे. कारण सगळेच घरात.आणि घरकाम करणाऱ्या कामकरी वर्गाची मदत ही नाही. त्यात घरेही पूर्वीसारखी ऐस पैस,प्रशस्त राहिली नाहीत. त्यामुळे प्रत्येकाची घुसमट वाढलेली.पण, येथील गृहिणीने यावरही मात केली. सर्वांच्या आवडीप्रमाणे चार वेळा रांधून अन्नपूर्णा झाली. त्यांच्या मनोरंजनाच्या खेळातली साथीदारही झाली. वृद्धांची सेवा करणारी,सदस्यांच्या आजारपणात सुश्रुषा करणारी नर्स झाली. शाळकरी मुलांना दिवसभर घरात गुंतवून ठेवणे हे सुद्धा मोठ्या जिकिरीचे काम असते.या काळात अभ्यास घेणारी शिक्षिका,संस्कार वर्गाची शिक्षिका,सदस्यांनी घरातच रमावे म्हणून त्यांचे छंद जपणारी गृहिणी, कुटुंबाच्या आहार-विहारा कडे लक्ष देणारी,रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी झटणारी, संसर्गच होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार करणारी डॉक्टर,मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर लक्ष ठेवणारी जागरूक आई,अशा निरनिराळ्या भूमिका व्यवस्थित पार पाडल्या पाडत आहे.त्यामुळेच जळगाव जिल्ह्यात कोविड १९ हातपाय पसरू शकला नाही.कुटुंबातील सदस्यांनीही समजूतदारपणा दाखवला असेल किंवा आहे तरी कुटुंबाची मुख्य धमनी तीच आहे. त्यामुळेच कोरोना महामारीत ही बालमृत्यूचे प्रमाण नगण्यच राहिले. घरा-घरातील, तान्ही बाळे,लहान मुले,सुखरूप आणि खेळती राहिली.

           लॉक डाऊन काळात आर्थिक बाजूची खिंड ती यशस्वीपणे लढवित आहे. नोकरदार,व्यावसायिक किंवा मजुरी करणारी स्त्री असेल तर चार पैसे ती संसारासाठी गाठीला ठेवते.आणि कमावती नसेल तर पतीकडून,मुलांकडून, सासरच्यांकडून घरखर्चासाठी म्हणून तिला देण्यात येणाऱ्या खर्चात,स्वतःच्या आवडी-निवडी ला काट मारून,कुटुंब खर्चात योग्य ठिकाणी काटकसर करून अडचणीच्या काळात उपयोगी पडतील, म्हणून थोडे पैसे साठवते. या बचतीसाठी डाळ-तांदळाचे डबे, कपाट, पेटीतील साड्यांच्या घडीत हे धन असते.अशा अनेक खजिन्याच्या गुप्त गुहा असतात.आपत्ती काळात कुटुंबाला आर्थिक गरज भासायला लागली की,तिच्या अलीबाबाच्या गुहे मधून पैसे दाग दागिने बाहेर पडून संसाराला हातभार लागतो.एवढ्यावरच तिचे आपत्ती व्यवस्थापन थांबत नसते तर संकटकाळात भाजीपाला, किराणा,यासारख्या जीवनावश्यक वस्तू देखील मिळत नाही. किंवा,महाग होतात. त्यावेळी ती उन्हाळ्याच्या दिवसात अपार कष्ट करून पहाटेच केलेले वाळवणीचे- साठवणुकीचे प्रकार, जसे की, पापड, कुरडया, वडे, सांडगे आंबापोळी,वाळलेली बोरे,कैऱ्या लोणचे,शेवया,मोरावळा,सुंठ, मसाले, मुरांबे यांचाही वापर करून कुटुंबाचे पोषण करते. त्यामुळे अर्थातच खर्च कमी होतो. यंदाही खान्देशातील गृहिणींनी लॉक डाऊन  काळातही,घराची जबाबदारी सांभाळून साठवणीचे पदार्थ केले.ते ही सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळून आणि हसतमुखाने,पारंपरिक गीत गाऊन.तर अशा या लढाऊ बाणा असलेल्या, दूरदृष्टी ठेवून निगुतीने संसार करणाऱ्या संकटाला खंबीरपणे सामोरे जाऊन कोरोना पासून कुटुंबाला संरक्षित ठेवणाऱ्या गृहिणी या रण-रागिणीचे रूप असतात त्याबरोबर लक्ष्मीचे ही रूप असतात पण मुख्य म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाच्या गुरू ही असतात.असे दिसून आले.तेंव्हा त्यांच्या प्रति आपण कृतज्ञ राहिले पाहिजे.

Have you also read?





Comments